"डॉ. आंबेडकरांचा सांगाती" - बळवंतराव वराळे या ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनाच्या निमित्ताने

बळवंतराव हणमंतराव वराळे 
(१९०१-१९७७)

बेळगावातील बेनाडी या गावी २ फेब्रुवारी १९०१ रोजी जन्म. १९२७ च्या महाड सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत (१९३७) स्वतंत्र मजूर पक्षातर्फे बेळगाव येथून ते निवडून आले. डॉ. आंबेडकरांनी १९४० साली स्थापिलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे ते धडाडीचे कार्यकर्ते होते. डॉ. आंबेडकरांशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ व घरोब्याचे संबंध होते. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाचे ते पहिले रजिस्ट्रार होते. काठमांडू येथे भरलेल्या चौथ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत ते डॉ. आंबेडकर यांच्या समवेत सहभागी होते. १९७५-७७ या काळात ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. ९ ऑगस्ट १९७७ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.  

दुसऱ्या आवृत्तीचे मुखपृष्ठ
 

प्रा. ल. बा. रायमाने यांनी सतत बळवंतराव ह. वराळेंचा पाठपुरावा करत "डॉ. आंबेडकरांचा सांगाती"च्या आठवणी वराळेंच्या तोंडून वदवून घेऊन त्या लिहून काढल्या. रायमाने यांनी सतत तगादा लावला नसता तर कदाचित या आठवणी आपल्यापर्यंत आज आल्या नसत्या. वराळेंनी सांगितलेल्या या आठवणी अत्यंत अचूक आहेत. वराळेंना डायरी लिहावयाची सवय असावी, त्याचे हे कारण होऊ शकते. 

बळवंतराव वराळे यांनी लिहिलेले डॉ. आंबेडकरांचा सांगाती हे पुस्तक डॉ. आंबेडकरांच्या आठवणींचा अस्सल खजाना आहे. मधल्या दोन दशकांत हे पुस्तक दुर्मिळ झाले होते. वाचकांची गैरसोय होत होती. वाचक पुस्तकांच्या फोटोकॉपीज (झेरॉक्स ) करून वाचत होते. खरेतर दुसरी आवृत्ती निघायला फारच उशीर झाला होता. परंतु २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे पुस्तक पुन्हा बाजारात आणले. या ग्रंथाची उपयुक्तता लक्षात घेऊनच त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचे काम आम्ही हाती घेतले. या कामात मला जेष्ठ विचारवंत विजय सुरवाडे यांची मदत झाली. डॉ. श्रीकांत वराळे व न्यायमूर्ती प्रसन्नजी वराळे यांनी दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने प्रस्तावना लिहून वाचकांशी हितगुज केले. यशोधरा वराळे, कुणाल वराळे यांचा प्रकाशन समारंभात पुढाकार होता.  तसेच वराळे कुटुंबियांचा पुढाकारही मोलाचा होता. 

कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका 

 "डॉ आंबेडकरांचा सांगाती"ची पहिली आवृत्ती १ ऑगस्ट १९८८ रोजी प्रसिद्ध झाली होती. आम्ही सुधारित दुसरी आवृत्ती १ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केली. पुस्तक पुनर्प्रकाशनाचा कार्यक्रम २८ डिसेंबर २०१६ रोजी औरंगाबाद येथे झाला. 

पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या ठिकाणी मांडलेले पूजास्थान

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुणाल वराळे यांनी बुद्धवंदना म्हटली. प्रकाशनापूर्वी वराळे कुटुंबातर्फे शहरातील विविध माजी व आजी न्यायमुर्तींचा सत्कार करण्यात आला.


‘बळवंतराव हणमंतराव वराळे यांनी ‘डॉ. आंबेडकरांचा सांगाती’ या पुस्तकातून त्या काळातील आठवणी, घडामोडी मांडल्या आहेत. हा एक अनमोल ठेवा आहे. हा अनमोल ठेवा केवळ मराठी माणसांपुरता मर्यादित ठेऊ नये, त्याचे विशेषत: इं‌ग्रजीत भाषांतर होणे अत्यंत आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्या. बी. एन. देशमुख यांनी केले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात बुधवारी विनिमय प्रकाशनाच्या ‘डॉ. आंबेडकरांचा सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी न्या. देशमुख बोलत होते. यावेळी मंचावर प्रा. ल. बा. रायमाने, न्या. प्रसन्न वराळे, डॉ. श्रीकांत वराळे, ज्येष्ठ विचारवंत विजय सुरवाडे, विनिमय प्रकाशनचे राजरत्न ठोसर यांची उपस्थिती होती.

‘कार्ल मार्क्सच्या जीवनात एन्जलला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच किंबहुना अधिक महत्त्व आंबेडकरांच्या जीवनात वराळेंना आहे. वराळेंचे आणि आंबेडकरांचे कौटुंबीक संबंध होते. बळवंतराव वराळे हे डॉ. आंबेडकर यांच्यासोबत सावलीप्रमाणे होते. आज आंबेडकरांच्या जीवनावरील आणखी एका पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. यानंतर त्यांनी आंबेडकर चळवळीसंबंधी आपण अभ्यासक नसलो तरी वराळे कुटुंबीयांकडून या चळवळीविषयी, आंबेडकरांविषयी आणि त्यांच्या संपूर्ण कार्याविषयी ऐकले आहे. त्यांच्याकडूनच आंबेडकर जवळून अनुभवता आले. या पुस्तकाच्या रुपाने असलेला अनमोल ठेवा प्रसन्न वराळे पुन्हा जनतेसमोर आणत आहेत. त्यांनी किंवा वराळे कुटुंबियांनी या पुस्तकाचे भाषांतर करून, विशेषत: इंग्रजीत भाषांतर करून ते प्रकाशित करावे,’ असे आवाहन न्या. देशमुख यांनी केले.

प्रा. ल. बा. रायमाने म्हणाले, "चळवळीतील वराळे, बुद्धगीत लिहिणारे वराळे यापासून ते बाबासाहेबांसोबत अगदी सावलीप्रमाणे राहणारे वराळे, हे खूप वेगळे होते. आयुष्य वाहिलेले व्यक्तिमत्व आणि आंबेडकर कुटुंबाचेही प्रेम लाभलेले वराळे खऱ्या अर्थाने ‘आंबेडकरांचे सांगाती’ होते." चळवळ, वराळेंचे लिखाणशैली, त्यांची समर्पित भावना, आंबेडकरी चळवळींतील विविध घटनांना उजाळा देताना रायमाने भावुक झाले होते.

ज्येष्ठ विचारवंत विजय सुरवाडे यांनीही वराळे कुटुंबीयांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक करताना न्या. प्रसन्न वराळे यांनी आजोबा बळवंतराव वराळे व पुस्तकाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश अचिंतलवार यांनी केले तर, डॉ. श्रीकांत बळवंतराव वराळे यांनी आभार मानले. 

ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या

दै. महाराष्ट्र टाइम्स (२९ डिसेंबर २०१६)



दै. दिव्य मराठी (२९ डिसेंबर २०१६)


दै. सकाळ (२९ डिसेंबर २०१६)

- राजरत्न ठोसर (संशोधक, लेखक व प्रकाशक)
विक्रोळी, मुंबई



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटोबायोग्राफी २२ व्या खंडाच्या सुधारित आवृत्तीची समीक्षा

बाबासाहेबांची चळवळ समजून घेण्याकरिता वाचक आणि संशोधकांसाठी खास पर्वणी! - अमित इंदुरकर

"डॉ. आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा