डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटोबायोग्राफी २२ व्या खंडाच्या सुधारित आवृत्तीची समीक्षा
२१ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर येथे सुधारित २२ व्या खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागरराव यांच्या हस्ते झाले. या ग्रंथाची किंमत ५०० रु. आहे व त्याची पृष्ठसंख्या ४०० अधिक १८ आहे. मुखपृष्ठ देखणे असून ग्रंथाची बांधणी उत्तमच आहे. हा ग्रंथ शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई येथे छापला असल्याचा उल्लेख आहे. रचना व मांडणी शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचनालय, मुंबईला केलेली आहे. या ग्रंथाचा पेपर १८० ग्राम आर्ट पेपर असून ग्रंथाची संपूर्ण छपाई फोर कलर प्रिंटिंगची आहे व काही पाने वन कलर प्रिंटिंगवर छपाई केल्याची शक्यता वाटते. सुधारित आवृत्तीची तारीख १४ एप्रिल २०१६ जरी असली तरी प्रत्यक्षात हा ग्रंथ डिसेंबर २०१७ ला प्रकाशित झालेला असून विक्रीसाठी ८ जानेवारी २०१८ ला उपलब्ध झालेला आहे. प्रतींची छापील संख्या ५०,००० असा आकडा आहे. सुधारित आवृत्ती समितीमध्ये प्रा. अविनाश डोळस, प्रा. दत्ता भगत, डॉ. ताराचंद्र खांडेकर, सचिन तासगावकर, रमेश शिंदे यांचे नाव आहे. ग्रंथाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा शुभसंदेश आहे. त्यानंतर सुधारित फोटोबायोग्राफीच्या निमित्ताने या सदराखाली सध्याचे सचिव यांचे लेखन आहे. कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीस हा ग्रंथ अप्रतिम वाटेल, असा आहे. परंतु त्यात काही चुका आहेत. चुका, दोष, त्रुटी मात्र सर्वसामान्यांना कळतातच असे नाही, त्यासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते. या ग्रंथात फोटोंचे कॅप्शन लिहिणारे किंवा फोटोंसंबंधित माहिती सांगणारे तज्ज्ञ कोणी आहे असे वाटत नाही. याचा अर्थ असा नाही की इतर व्यक्ती अभ्यासू नाहीत. त्या अभ्यासू जरूर असतील, परंतु बाबासाहेबांच्या फोटोंसंदर्भात जाणकार नक्कीच नाहीत. तसे असते तर या सुधारित २२ व्या खंडातदेखील अनेक चुका आहेत त्या त्यांच्या हातून झाल्या नसत्या.
त्यात ते लिहितात, "समितीने सन २०१० सालातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चित्रमय चरित्र (फोटोबायोग्राफी) हा खंड प्रकाशित केला होता. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत हा २२ वा खंड प्रकाशित केला. बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो संकलित करून जवळजवळ १९८ फोटोंचा त्यात समावेश होता. या खंडाची छपाई अत्याधुनिक यंत्राद्वारे करून घेतली गेली होती. एवढे सर्व करूनही खंडाचे प्रकाशन झाल्यानंतर त्याबद्दल वेगवेगळे आक्षेप वाचकांकडून, अभ्यासकांकडून घेण्यात आले. वर्तमानपत्रातूनही यासंबंधी लेखांच्या स्वरूपात हरकती व आक्षेप नोंदविले गेले. या सर्व बाबींचा विचार करून समितीने दिनांक ७ ऑगस्ट २०१२ च्या बैठकीत एक उपसमिती नेमली. त्यात सदस्य सचिवांसह प्रा. रावसाहेब कसबे, पूर्व सदस्य प्रा. दत्ता भगत, डॉ. ताराचंद्र खांडेकर, सचिन तासगावकर व रमेश शिंदे यांचा समावेश केला. या उपसमितीने या खंडाच्या संदर्भात उपस्थित केलेल्या हरकती, आक्षेप व सुचनांचा विचार करून दुरुस्ती व सुधारणा करण्याऐवजी या खंडाची सुधारित आवृत्ती तयार करून ती प्रकाशित करावी असा दि. ५ सप्टेंबर २०१२ च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दि. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी संहिता तयार करून समितीने दि. १० जून २०१४ रोजी त्यास मान्यता दिली. हा फोटोबायोग्राफी खंड प्रेसकडे छपाईसाठी दिला गेला. या प्रक्रियेनंतर आज हा सुधारित चित्रमय चरित्राचा २२ वा खंड वाचकांसमोर सादर होत आहे. ही एक आनंदाची बाब आहे." (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र खंड २२ वा, पहिला परिच्छेद, पृ. क्र. दिलेले नाही)
असे जरी असले तरी काही चुका दुरुस्त करून चुकांची पुनरावृत्ती व नवीन चुका या सुधारित खंडात केलेल्या आढळतात. कोणत्या ठिकाणी कसा मराठी किंवा इंग्रजी टाईपचा फॉन्ट वापरावा याचे अनेक ठिकाणी विचित्र संयोजन वाटते. या सुधारित २२ व्या खंडाचा लेआऊट कसा असावा याची काळजी कोणीही घेतलेली नाही. लेआऊटची गंधितवार्ता संपादकांस किंवा सदस्यांस आलेली नाही. या फोटो अल्बमसाठी वेगळ्या पद्धतीचे पुस्तकाचे लेआऊट व डिझाईन असायला पाहिजे, ही बाब कोणाच्याही लक्षात न आल्याने सबंध ग्रंथाचे लेआऊट व डिझाईनसंबंधी बारा वाजले आहेत. पुस्तकातील अनेक फोटोंचे कॅप्शन्स तर हास्यास्पद आहेत. अनेक फोटोंचा तारीखवार गोंधळ दिसून येतो. फोटोंची माहितीही अपुरी आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक फोटोंबद्दल अचूक माहिती उपलब्ध असताना या खंडात ती घातली नाही, याचे वाचकांना आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.
"वाचकांच्या आग्रहास्तव फोटोंच्या संदर्भातील माहितीही देण्याचा प्रयत्न केलेला असून शक्यतो फोटो कधी काढला याचा शोध घेऊन त्यांचे साल नोंदविले आहे. त्या फोटोंमध्ये ओळखू आलेल्या व्यक्तीची नावेही दिली आहेत." (उपरोक्त, दुसरा परिच्छेद खालून ६-८ वी ओळ) सदस्य सचिवांनी असे जरी लिहिलेले असले तरी तशी फोटोंसंबंधी अधिकृत माहिती या ग्रंथात उपलब्ध नाही. पुढे ते लिहितात, "या खंडातील दुर्मिळ पत्रके ही प्रसिद्ध संशोधक व आंबेडकरी साहित्याचे संग्राहक रमेश शिंदे, प्रा. रमाकांत यादव, महेश भारतीय, विजय सुरवाडे यांची मदत झाली. त्यांचे आभार." (उपरोक्त, पृ. क्र. दिलेले नाही) विजय सुरवाडे यांनी स्वतः संपादित केलेले बाबासाहेबांच्या फोटोंचे दोन मोठे अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. त्या तुलनेने २२ व्या खंडासंबंधी पाहता कॅप्शनचे फोटोग्राफीत फोटोंना नव्याने क्रम देऊन संदर्भ टिपा दिल्या असल्याचा दावा सदस्य सचिवांनी जरी केला असला तरी तळटिपांची व फोटोंच्या अचूक माहितीची उणीव सबंध ग्रंथात आहे. सदस्य सचिवांच्या या म्हणण्यात काही तथ्य नाही. "या चित्रमय चरित्र ग्रंथासाठी श्री. महेश मुळे यांनी खास रस घेऊन मांडणी व सजावट करून दिल्याबद्दल त्यांचे आभार." (उपरोक्त, खंड २२) कितीही रस घेऊन मांडणी व सजावट केलेली असली तरीही डिझाइनर या बाबतीत अपयशी ठरले आहेत. अतिउत्कृष्ठ डिझाइनरांचा बाजारात अजिबात तुटवडा नाही.
पृष्ठ क्र. १ ते २४ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहिलेले आहे. त्यात २४ पाने खर्ची घातलेली आहेत. फोटोबायोग्राफी ग्रंथात वेगळे चरित्र लिहिण्याची काही आवश्यकता नसते. त्याऐवजी फोटोच देणे अधिक योग्य असते. कारण चरित्र वाचण्यासाठी वाचक हा ग्रंथ खरेदी करत नसतो. फोटोंच्या चरित्रात फोटोच असायला पाहिजेत. सदस्य सचिवांचे ते २४ पानी लेखन किती वाचक काळजीने वाचतील कोणास ठाऊक? २४ पाने नुसते लिखाणात खर्ची घातली आहेत. फोटोंची कमतरता असती तर ते समजून घेण्यासारखे होते. अशाच प्रकारचे निदान ५ तरी खंड छापता येतील इतके बाबासाहेबांचे फोटो अनेक नामवंत व्यक्तींच्या संग्रही असताना, ते घेतले गेलेले नाहीत. अनेक फोटो विनाकारण लहान आकाराचे केलेले आढळतात. पृ. क्र. २११ वर फोटोच्या खाली कॅप्शन असे लिहिले आहे, "दि. ३० जानेवारी १९४८ गांधी खूनप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस कमिटीचे शंकरराव देव यांच्याशी चर्चा करताना, बिर्ला हाऊस दिल्ली." हा "खूनप्रसंगी चर्चा करताना" वाक्यप्रयोग योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गांधींच्या अंत्यदर्शनाला गेले होते. पृ. क्र. २२२ वरील फोटो तर अत्यंत विचित्र पद्धतीचा आहे. त्या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे डोके दुसऱ्याच फोटोचे आहे. ही चूक आधीच्या आवृत्तीत केलेली होती. तिची पुन्हा पुनरावृती तशीच केलेली आहे. मुळात हा फोटो १९४९ सालातील आहे, असा उल्लेख आहे; परंतु त्या फोटोतील चेहऱ्याचे वयोमान बघता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तरुणपणीचा चेहरा त्या फोटोत लावलेला आहे. संपादकांनी त्या फोटोबद्दलची सत्यता पडताळण्याची काळजी पहिल्या आवृत्तीतही घेतली नव्हती व आता या आवृत्तीतही घेतलेली नाही. पृ. क्र. २०६ वर हिंदू कोड बिलासंबंधी फोटो आहे, त्यात फक्त "हिंदू कोड बिलावर पंडितांबरोबर चर्चा" असे कॅप्शन आहे, त्या फोटोतील सर्व व्यक्तींची नवे उपलब्ध असताना ती का दिलेली नाही? पृ. क्र. २६५ वरील कॅप्शन "निवेदन कुणीही देवो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अतिशय गंभीरपणे त्याची दाखल घेत-असाच एक क्षण" याचा आणि फोटोचा काय संबंध आहे, हे द्यायला हवे होते.
तरुण डॉ. आंबेडकर, तारुण्यातील डॉ. आंबेडकर, ऐन उमेदीतील डॉ. आंबेडकर, डॉ. आंबेडकरांची एक मुद्रा, विद्यार्थी दशेतील डॉ. आंबेडकर, एक प्रसन्न मुद्रा, चिंतनमग्न डॉ. आंबेडकर, एका निवांतक्षणी, एक भावमुद्रा, एका प्रसंगी, विचारमग्न, एक विद्रोही मुद्रा, आक्रमक मुद्रा, आधुनिक विचार-आधुनिक पोशाख, धम्मदंड, अभ्यासमग्न अशी बालिश व हास्यास्पद कॅप्शन्स जशी मनाला सुचतील तशी दिलेली आहेत. संपादकांना संशोधन करून खरी माहिती लिहिण्याची आवश्यकता वाटली नाही. फोटोंना उगीचच बॉर्डर दिल्याने सर्वच फोटोंचा शो गेलेला आहे. पृ. ४४ वरील फोटो अत्यंत क्लियर उपलब्ध असताना तो पुसट फोटो छापलेला आहे. पृ. क्र. ५४ वरील फोटो १८२० सालचा आहे, अशी माहिती दिली ती चूक आहे. पृ. क्र. ८५ व ८७ वरील फोटो क्लियर नाहीत, तेच फोटो इतर ठिकाणी अत्यंत चांगले आढळून येतात. पृ. क्र. १०८ वर दिलेला जाहीरनामा स्पष्ट दिसत नाही. तो भिंग घेऊन वाचायचा काय? पृ. क्र. ८५, १३० व १३१ वरील दोन्ही फोटो सर्वप्रथम कोल्हापूरचे कालकथित सुधीर पोवार यांनी संशोधन करून अत्यंत कष्टाने मिळवले होते व त्यांनी स्वतः सदस्य सचिवांना ते दिले होते. सुधीर पोवारांचा तसा पुस्तकात कुठेही उल्लेख करण्याचे धैर्य सदस्य सचिवांनी केले नाही. पृ. क्र. १४८ वरील फोटोची माहिती चुकीची आहे. पृ. क्र. १७१ वरील फोटो खेचलेला आहे. पृ. क्र. १७५ वरील फोटोत भारतीय घटना समितीच्या सर्व सदस्यांची नावे उपलब्ध असताना ती दिली गेलेली नाहीत. पृ. क्र. १९५ ते २०८ संविधानाची फोटोकॉपी व संविधान सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहेत, त्यांचीही येथे देण्याची आवश्यकता नव्हती, फक्त बाबासाहेबांची सही असलेले एक पान देणे पुरेसे होते. पृ. क्र. २७१ व ३६१ वरील फोटो एकाच तारखेचे असताना वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत.
उपरोक्त अशा अनेक चुका या नवीन सुधारित आवृत्तीत देखील केलेल्या आहेत. फरक मात्र एवढाच की आधीच्या पहिल्या आवृत्तीत जास्त चुका, त्या या आवृत्तीत कमी केलेल्या असल्या तरीही नवीनही चुका मात्र आहेतच. या २२ व्या खंडाबाबत दुर्दैवाची गोष्ट अशी म्हणावी लागेल की, भरपूर वेळ, पुरेशी साधनसामुग्री, पत्रव्यवहार, भरपूर फोटो, त्यांची माहिती इतरत्र उपलब्ध असताना देखील या आवृत्तीत ती समाविष्ट करण्याची तसदी संपादकीय मंडळाने घेतलेली दिसून येत नाही. १८० ग्राम (जीएसएम) आर्ट पेपर व फोर कलर प्रिंटिंगचा जास्तीत जास्त फायदा घेतलेला नाही.
हा २२ वा सुधारित खंड महाराष्ट शासनाच्या समितीने प्रकाशित केलेला आहे. जेव्हा एखादा ग्रंथ सरकार प्रसिद्ध करते तेव्हा त्यात येणारी जी काही माहिती असते, फोटो असतात, संशोधन असते किंवा चुका असतात अशा गोष्टींना अधिकृत दर्जा आपोआप प्राप्त होत असतो. १०० वर्षांनंतर त्या व्यक्ती राहत नसतात, मात्र ग्रंथ हे राहतात. तेव्हाच्या पिढीला ह्या चुकांचे आकलन कसे होईल? त्यामुळे अशा समितीने कोणतेही लेखन संशोधनात्मक लिहून, त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांना नियुक्त करून, त्या त्या विषयाला योग्य तो न्याय देण्याची गरज असते. तशी खबरदारी व काळजी या सुधारित २२ व्या खंडासाठी घेतलेली दिसून येत नाही. या चुकांचे/उणीवांचे खापर कोणावर फोडायचे हाच प्रश्न तमाम आंबेडकरी जनतेपुढे असेल! फुले-शाहू-आंबेडकरांचे साहित्याचे काम हे चाचणीच्या (trial) आधारावर करायचे नसते, त्या कामासाठी विद्वान व तज्ज्ञ व्यक्तींचीच गरज असते, हे मला वाचकांना वेगळे सांगण्याची आवश्यकता वाटत नाही.
- राजरत्न ठोसर
(पूर्वप्रसिद्धी- दै. सम्राट १७ फेब्रुवारी २०१८ )
छान माहिती
ReplyDeleteधन्यवाद
DeleteRevised edition is also with mistakes. Govt. should have taken the services of Shri.Vijay Surwade Saheb,who is the authorised person in Dr. Ambedkar's photos subject, then this shouldn't happened.
ReplyDeleteविजय सुरवाडे सरांना जाणूनबुजून डावलले, त्याचा तो परिणाम झाला.
DeleteGood information...
ReplyDeleteधन्यवाद
DeleteRevised edition is also with mistakes Govt. Should have taken services of authentic person like Vijay Surwade Saheb who is authorized person in this field.
ReplyDeleteखुप छान महत्त्वपूर्ण माहिती
ReplyDeleteसर आपल्या जवळ बाबासाहेबांची मुलाखत जी नवयुग वृत्तपत्रात १३ एप्रिल १९४७ ला दिली होती त्याची पुरवणी आहे का? असल्यास उपलब्ध होऊ शकते का?
नवयुग डॉ. आंबेडकर विशेषांक १९४७ चा प्रसिद्ध केलेला होता, सध्या उपलब्ध नाही.
Delete